पंचायतन पूजा


 पंचायतन पूजा परिचय 

देव म्हणजे दिव्य शक्ति. पांच प्रकारच्या साकार दिव्य शक्तींची एकत्र पूजा म्हणजे पंचायतनपूजा होय. इष्ट ध्येय साधण्याच्या दृष्टीनें त्यांची रचना म्हणजे पूजा स्थानीं मांडण्याची पद्धती पुढें देत आहे. पण त्या पूर्वी त्याच्या प्रतीकांचा परिचय करून घेऊं. 

पांच देवता व त्यांची घरगुती प्रतीकें 

गणपति, शिव, हरि, भास्कर व अम्बा ह्या त्या पांच देवता होत. स्फुल्लींग हा जसा अग्नीचें केंद्रित शक्ती स्वरूप असतें, किंवा बीज हे जसें वृक्षाचें केंद्रीकृत किंवा केंद्रीभूत सूक्ष्म स्वरूप असतें, त्याचप्रमाणें वरील देवदेवता प्रतीकृपानें आहेत. 

वरील पांच देवांपैकी देवी ( अम्बा ) ह्या देवतेचीच कोठें धातुमय प्रतिमा ( कोठें सुवर्णमुखी देवी म्हणून स्वर्णमाणिकाचा खडा असतो ) असते; तर कोठें ललितापंचमीच्या पूजा निमित्ताने करंडकाचे झाकणं ‘देवी’ म्हणून असतें. इतर देव पुढे दिलेल्या स्वरूपांत असतात. जसें-नर्मदा नदींतील लाल रंगाचा पाषाण म्हणजे ‘गणपती’ यालाच सामान्यतः ‘नर्मद्या गणपति’ असें म्हणतात. काही घराण्यांत धातुमय गणपतीची लहान पांढरा पाषाण. तो शिव असतो. गंडकी नदीतील काळ्या रंगाचा गोल किंवा लांबट असा पाषाण तो विष्णु (त्याला ‘शालिग्राम’ म्हणतात)  आणि चापट बैठकीचा गोलाकार ‘स्फटिक मणि’ वा ‘सुर्यकांत मणि’ तो सूर्य या स्वरूपांत असतो. अशा प्रकारची पंचदेव पूजा, पंचायतन पूजा - ही भारतांतील सर्व संप्रदायांच्या संरक्षणाच्या, व्याक्तिविचार स्वातंत्र्याच्या, पण टिकाऊ सामाजधारणेच्या दृष्टीने, आद्य शंकराचार्यांनी जास्त जोरानें प्रचारित केली असे मानितात. 

पांच देवता - पांच शक्ति :- गणपति हा बुद्धिदाता आहे. बुद्धि (सदबुद्धि, चतुरबुद्धि, सर्व श्रेष्ठ बुद्धि ) रुपी शक्ती प्राप्त होण्यासाठीं गणपतीची उपासना करावयाची असते. शिव देवता परमोच्च ज्ञानाचें विश्वचैतन्य ज्ञानाचें, मूर्तस्वरूप आहे. सर्व प्रकारच्या परमोच्च वैभवाचें आगर विष्णू ही देवता आहे. भास्कर म्हणजे सूर्य ही सर्वश्रेष्ठ अशा तेजाची तेज:सामर्थ्याची, देवता आहे. आणि अम्बा म्हणजे देवी ही अद्विती सामर्थ्याची, शत्रू म्हणजे विरोधी शक्तींचा नाश करणारी, देवता आहे. अशा ह्या पांचही प्रकारच्या शक्ति प्राप्त करून घेणें हा पंचायतन पूजेचा हेतू आहे. 


टिप्पणियाँ

Populars