वास्तु शांती विधान





।। श्री वास्तु शांती विधान ।। 

        प्रथम आपण आपली जागा शुद्ध करावी. आम्ही गुरुजी तुमच्याकडे येऊन पूर्व दिशेला वास्तुशांतीची संपूर्ण मांडणी करतो. पूजेची सर्व तयारी करावी. यजमानांनी सपत्नीक स्नान करुन सोवळे नेसून वास्तुमंडपामध्ये प्रवेश करावा. आसनावर बसावे. आपल्यासमोर तांब्या, ताम्हण, पेला-पळी ठेवावे. गुरुजी यजमानांना स्वस्तितिलक लावतात. पवित्र धारण करण्यासाठी देतात. केशवादि आचमन करुन प्राणायाम करावा. शांतीसूक्ताचा संकल्प करून यजमानांनी देवापुढे विडा, नारळ ठेऊन देवांना वास्तुशांतीसाठी आमंत्रण द्यावे. देव, ब्राह्मण, उपस्थित थोर मंडळीस नमस्कार करून देव घेउन आसनस्थ व्हावे. आचमन करून प्राणायाम करावा. 

प्रधान संकल्प - यजमानांच्या हातामध्ये पाणी, अक्षता, फूल, नाणे, सुपारी देउन संकल्प करावा. संकल्प म्हाणजे आज मी या पृथ्वीवर कोठे बसलेला आहे, आजची आकाशातील ग्रहांची स्थिती काय आहे, आज तिथी, वार, नक्षत्र, योग, करण कोणते आहे, यालाच पंचांग म्हणतात. या पंचांगांचा उल्लेख करून आपल्या गोत्राचा उच्चार करावा. आपले स्वतःचे नाव घेउन मी ही पूजा कोणासाठी, कश्यासाठी करणार आहे, मला याने काय मिळावे, याचा उल्लेख करून विशेष असा वास्तुशांतीचा संकल्प केला जातो. 

वास्तुशांती संकल्प - माझी ही जागा बांधतांना सर्वप्रथम या जमिनीवर जे संस्कार केले गेले, ते संस्कार करीत असतांनी भूमीदेवतेला जे दुःख झाले असेल. जमीन खणणे, तोडणे, कापणे, भाजणे, भिजवणे, तुडवणे, कांडणे, कमी जास्त करणे, उंच सपाट करणे, हे करीत असतांना, तसेच जमीनीतून सुवर्ण, रजत, ताम्र, तपु, सीसक, कांस्य, लोह, पाषाण इत्यादि काढुन घेत असतांना जे दोष निर्माण झाले असतील तसेच कीटक, क्रुमी यांची हत्या झाल्यामुळे निर्माण झालेले जे दोष असतील, ते सर्व दोष निघुन जाऊन मला माझ्या या नवीन जागेमध्ये सदासर्वदा सुखशांती लाभावी, मनातील हेतू पूर्ण व्हावे, शत्रूंचा नाश होऊन माझ्या कुटुंबातील सर्वांना दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे. धनधान्य, पुत्र, पौत्र, किर्ती, यश लाभ मला प्राप्त व्हावे. वास्तुपुरुषाचा आशिर्वाद मला प्राप्त व्हावा, नवग्रह मला अनुकुल व्हावे. म्हणून मी आज वास्तुशांती करीत आहे. असा प्रधान संकल्प करावा. नंतर या वास्तुशांतीचे अंगभूत म्हणून मी गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, दिग्रक्षणम, पंचगव्यकरण, भूमीपूजन, स्थंडील निर्माण, संस्कार, अग्नीस्थापना, वास्तुमंडल देवता स्थापना, प्रधान कलश स्थापन, वास्तुसहित ध्रुव देवता पूजन, नवग्रहमंडल देवता स्थापन, रुद्रपूजन करुन नंतर हवन, उत्तरपूजन, बलीदान, पुर्णाहुती, वास्तुनिक्षेप करतो, असा दुसरा संकल्प केला जातो. गणपती स्मरण करुन कलश पूजन, शंख - घंटा पूजन, दिपपूजन, आदित्यपूजन, आसन पूजन केले जाते. 

गणेशपूजन पुण्याहवाचन - गणपतीचे ध्यान करुन त्याची षोडशोपचार पध्दतीने पूजा केली जाते. प्रार्थना करुन मग पुण्याहवाचन म्हणजेच कलशपूजन केले जाते. प्रथम यजमानांनी जमिनीला, गहू किंवा तांदूळाला, कलशाला स्पर्श करावा. कलशात सात नद्यांचे पाणी घालावे. कलशामध्ये गंध, हळद, दुर्वा, एक नाणे, पंचरत्न, सुपारी, दशॊषधी , सप्तमृतिका घालावे. पंचपल्लव घालून त्यावर नारळ ठेवावे. कलशाला गंध, अक्षता, हळद-कुंकू फूल वहावे. बेल, तुळस, दुर्वा वाहून फळाचा नैवेद्य दाखवावा. कलशाची प्रार्थना करावी. पूजा केलेला कलश उचलून आपल्या कुटुंबातील सर्वांच्या कपाळाला तीनवेळा लावावा. ब्राह्मण पूजन करुन त्यांचे आशिर्वाद घ्यावे. ही शांती आपण सर्वांनी प्रसन्न होऊन करावी, अशी ब्राह्मणांची प्रार्थना करावी. माझ्या घरामध्ये सदासर्वदा सुखशांती राहो, जे रोग असतील ते निघून जावो, यासाठी त्या कलशातील शुभ याचे पाणी अस्तु म्हणत समोरील ताम्हणात काढावे. अशुभ याचे पाणी बाहेर काढावे. त्यानंतर या वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना पुण्य लाभो, आमच्या सर्वांचे कल्याण होवो, आमच्यातील चांगल्या गोष्टी वाढो, आम्हाला मानसिक स्वास्थ लाभो, आम्हाला पैसा मिळो, ह्या पाच गोष्टी देवांकडे मागाव्या. ताम्हणामध्ये काढलेल्या शुभ गोष्टींच्या पाण्याने सर्वांना अभिषेक करावा. आपले आयुष्य वाढावे, या हेतुने सुहासिनीकडून औक्षण करुन घ्यावे. त्यांना मान द्यावा. ह्या पद्धतीने पुण्याहवाचन केले जाते. 

मातृकापूजन - मातृका म्हणजेच देवी. यामध्ये गणपती, कुलदेवतासहित सोळा देवतांचे पूजन केले जाते. १. गणपती २. गौरी ३. पद्मा ४. शची ५. मेधा ६. सावित्री ७. विजया ८. जया ९. देवसेना १०. स्वधा ११. स्वाहा १२. मातरा १३. लोकमातरा १४. ध्रुती १५. पुष्टी १६. तुष्टी १७. कुलदेवता. या त्या देवता होय. यांची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर सात घृत मातृकांचे पूजन केले जाते. नैवेद्य दाखवून देवीची स्तुती केली जाते. यजमान पत्नीकडून वायनदान केले जाते. आयुष्यमंत्रजप - यजमानांना आरोग्यसहित दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे, यासाठी हे मंत्र म्हणून यजमानांना आशिर्वाद दिले जातात. 

नांदीश्राद्ध - नांदी म्हणजे शुभ, मंगल. या मंगलमय वातावरणात होणारे श्राद्ध म्हणजेच नांदीश्राद्ध होय. प्रारंभी जसे आपण देवांचे, उपस्थितांचे आशिर्वाद घेतले तसेच या ठिकाणी पूर्वजांचे स्मरण केले जाते. कितीही झाले तरी नांदीश्राद्ध हे अशुभ असते म्हणून यजमानांनी धारण केलेले पवित्रक काढून हात-पाय धुवावे. प ब्राह्मणवरण - मंत्रिमंडळामध्ये ज्याप्रमाणे पदाधिकारी असतात. त्यांना त्यांची कामे आखून दिलेली असतात. त्याचप्रमाणे या कार्यामध्ये १. आचार्य २. ब्रह्मा ३.गाणपत्य ४. सादस्य असे पदाधिकारी नेमलेले असतात. ब्राह्मणांना मानसन्मान देऊन त्यांची प्रार्थना केली जाते आणि या शांतीची जबाबदारी ते ब्राह्मण वृतोस्मि असे म्हणून स्विकारतात. दिग्रक्षणम - यजमानांच्या हातामध्ये पिवळी मोहरी देऊन ती दाही दिशांना टाकावी, त्यामुळे आपल्या वास्तुमध्ये अद्रुश्य स्वरुपात काही तांत्रिक देवता असल्यास त्या निघून जाव्या, किंवा त्यांचा नाश व्हावा हा हेतू असतो. 

पंचगव्यकरण - गाईपासून उत्पन्न झालेले गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप हे कांस्यपात्रात एकत्र करून त्यात दर्भाचे पाणी घालावे. ते अभिमंत्रीत करून जागाशुद्धीसाठी सर्वत्र प्रोक्षण केले जाते. देहशुद्धीसाठी प्राशन केले जाते. भूमीपूजन - हवनकुंडाजवळ जमीनीवर भूमी, कूर्म, अनंत या तीन देवतांची पूजा केली जाते, कुंडामध्ये भूसंस्कार करून अग्नीस्थापना करतात. ( शक्य नसल्यास हवनाच्या वेळी अग्नी स्थापन करु शकतात). प्रधान देवता - वास्तुमंडल स्थापना - हे मुख्य पीठ आहे. चौरंगावर पीस बांधून रंगीत तांदुळाचे वास्तुमंडल मांडले जाते. चौरंगाच्या कडेला खैराच्या लाकडाचे चार शंकू मातीच्या गोळ्यात उभे करून सूत्राने वेष्टन केले जाते. शंकूमध्ये नागाची स्थापना केली जाते. त्यांची पूजा करतात. वास्तुमंडलावर सोन्याच्या काडीने १० उभ्या व १० आडव्या रेषा आखल्या जातात. निर्माण झालेल्या ८१ चौरस व त्याबाहेर एकुण ७७ देवतांची स्थापना केली जाते. त्यावरती दोन कलशांची स्थापना करुन वास्तु, ध्रुव नाग यांची विधीवत पूजा केली जाते. ग्रहमंडल स्थापना - यामध्ये ग्रहांची स्थापना केली जाते. एकुण ९ ग्रह, त्यांच्या अधिदेवता ९, प्रत्याधिदेवता ९, पंचलोकपाल वास्तु, क्षेत्रपाल ७, दहा दिशांच्या १० देवता अश्या एकुण ४४ देवतांची स्थापना केली जाते. यथाशक्ती पूजन करुन नवग्रहांची प्रार्थना करतात. रुद्रपूजन - स्थापनेमध्ये शेवटी रुद्र ( शिवा) चे पूजन करतात. आणि शिवाची प्रार्थना केली जाते. 

हवन - सर्व देवता स्थापन झाल्यानंतर अग्नीस्थापना, संस्कार केले जातात. हवनात काळे तीळ, तूप, भात, समिधा हे द्रव्य घेतात. प्रथम गणेश आहुती देउन नवग्रह मंडलाचे हवन करतात. त्यानंतर प्रधान हवन - वास्तु, ध्रुवचे हवन करतात. वास्तुमंडलाचे हवन केले जाते. शिवाच्या अघोर मंत्राचे हवन झाल्यावर स्थापित देवतांचे उत्तरपूजन स्वीष्टकृत केले जाते. दहा दिशा व स्थापित देवता यांना बली दिला जतो. त्यानंतर क्षेत्रपालाचे पूजन करतात. क्षेत्रपालाची प्रार्थना करून आपल्या वास्तुमधुन तो बाहेर काढला जातो. शेवटी अग्नी तृप्त व्हावा यासाठी नारळ किंवा सुपारी घेऊन महाआहुती देतात. यालाच पुर्णाहुती म्हणत्तात. नंतर शिल्लक राहिलेल्या तुपाची अखंड धार अग्नीमध्ये धरतात. याला वसोर्धारा असे म्हणतात. भस्म धारण करुन अग्नीची प्रार्थना केली जाते. संश्रव प्राशन करुन या यागाचे फळ यजमानांना देतात, त्याला श्रेयोदान असे म्हणतात. ब्राह्मणांकडून अभिषेक केला जातो. ब्राह्मणांना दक्षिणा तसेच नाना प्रकारचे दान दिले जाते. ब्राह्मणांकडून आशिर्वाद घेउन देवांना नैवेद्य दाखवून वास्तुशांतीची सांगता केली जाते. 

वास्तु निक्षेप - आपल्या जागेत अग्नेय दिशेला एका कडेला लहान खड्डा करून त्यामध्ये पाणी, माती, सप्तधान्य घालावे. गंध, फूल वहावे. औदुंबराच्या पेटीमध्ये पंचरत्न, थोडे शेवाळे, धान्य घालून वास्तुप्रतिमा पालथी ठेवावी. ती डबी त्या खड्ड्यात ठेवावी. त्यावर फूल वहावे. धान्य, माती घालून जागा भरावी. ग्रुहप्रवेश - वास्तुशांतीच्या दिवशी हा विधी मुहुर्ताप्रमाणे सर्वात प्रथम, शेवटी किंवा कर्माच्या मध्ये करता येतो. वास्तुप्रवेशाला लग्न पहावे. मेष, कर्क, तुला, मकर हे लग्न नसावे. प्रथम द्वारदेवतेचे पूजन करुन स्वस्तिक, शुभ-लाभ काढावे. गणपती, कलश पूजन करावे. यजमानांनी देव हातात घ्यावे. यजमान पत्नींनी कलश डोक्यावर घेउन वास्तुप्रवेश करावा. देवांना आपली सर्व जागा दाखावावी. नंतर अग्नीपूजन, माठ पूजन , कपाट पूजन करावे. ह्या वास्तुमध्ये तुम्हाला सदासर्वदा सुख-शांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.

टिप्पणियाँ

Populars