आद्य गुरु शंकराचार्य

आद्य गुरु शंकाराचार्य आणि भारतीय एकात्मतेचा प्रवास संकलक - पं. मकरंद गणेश गर्गे, नासिक आज एकविसाव्या शतकाच्या संधिकालात भारतीय सनातन धर्माची मूलतत्त्वे, संस्कृति व परम्परा अखिल जगतात मानाने उभ्या आहेत, याचे श्रेय ऐतिहासिक काळातील दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या तीन महामानवांना आपणास द्यावे लागते. हे महामानव म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य, श्रीज्ञानेश्वर महाराज व रामकृष्ण परमहंस! आठव्या तेराव्या आणि एकोणिसाव्या शतकात या महामानवांनी व त्यांच्या निकटच्या शिष्यवरांनी कालानुरुप मूळ वैदिक व शाश्वत सिद्धांतांची मांडणी व त्यानुसार आचार्यधर्म प्रवर्तित केला नसता तर रोमन, ग्रीक व इजिप्तच्या संस्कृतिप्रमाणे भारतीय संस्कृति देखिल इतिहासजमा झाली असती. आद्यशंकराचार्यांचा जन्म इ.स. 586 मध्ये (काहींच्या मते इ.स. 788 मध्ये) वैशाख शुद्ध तृतीयेला (अक्षय्यतृतीया) माध्यान्ही झाला. केरळमधील पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर कालटी या खेड्यात नंबुद्री ब्राह्मण कुलात त्यांचा जन्म झाला. आचार्यांच्या आईचे नांव सतिदेवी व वडिलांचे नांव शिवनाथ असे होते, लवकरच त्यांचे वडील वारले, आचार्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की, ते एक वर्षांचे असतांनाच त्यांना संस्कृत मध्ये बोलता येऊ लागले, दोन वर्षाचे होताच पुराणे कंठस्थ केली. पाच वर्षाचे असतांना मुंज झाली. वयाचे आठ वर्षाचे असतांनाच संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचा निश्चय केला व एके दिवशी ते आईस म्हणाले की, मला संन्यास घेण्याची आज्ञा दे. हे शब्द ऐकताच आकाश कोसळावे तशी आईची अवस्था झाली, एकुलता एक सुन्दर, सुगुणी, सुशील व सुज्ञ मुलगा आणि तोच आपला जीव का प्राण असे ती मानीत होती. हा जर संन्यास घेवून गेला तर माझे कसे काय होणार या चिंतेने तिला काळजी वाटू लागली. आचार्यांनी तिचे गोड बोलून तात्पुरते सान्त्वन केले व मनात म्हणाले "सन्यास घे' अशी आज्ञा कोणत्या तरी युक्तीने आपण मिळवू. असेच एकदा पर्वणीच्या दिवशी आचार्य व त्यांची आई नदीवर स्नानासाठी उतरले तेव्हा बाल शंकराचार्यांनी आईला खोटेच सांगीतले की, मला मोठ्या मगरीने पकडले आहे, ती मगर मला सोडेल परंतू तू मला सन्यास घेण्याची आज्ञा दे. आईला ते खरे वाटले, ती घाबरली, मुलाचे बरेवाईट होऊ नये या भितीने तीने संन्यास घेण्याची आज्ञा दिली. पडत्या फळाची आज्ञा म्हणतात त्याप्रमाणे, आईची आज्ञा किंवा संमति समजून ताबडतोब घराचा त्याग करून सन्यास घेण्यासाठी गेले. थोर लोक आपले ध्येय प्राप्तीसाठी अशाच संधीची वाट पाहत असतात, नव्हे अशा संधी घडवून आणतात, श्री समर्थ रामदास प्रपंचाचा त्याग करण्यासाठी अशाच संधीची वाट पाहत होते, द्विजगणांनी "सावधान' असे म्हणून मस्तकावर अक्षता टाकताच तात्काळ गृहाचा त्याग करून तपश्चर्येसाठी वनात निघून गेले. ज्याप्रमाणे अर्जुनाचे निमित्त करून श्रीकृष्णाने सर्व जगास उपदेश केला त्याप्रमाणे आईला उपदेश देतांना बाल शंकराचार्यांनी "मी व माझे' हा भ्रम आहे. जसे शुष्क हाड चघळत असताना आपली लाळ त्या हाडावर लागल्याने कुत्र्यास भ्रमाने असे वाटते की हाडुक गोड नसून याची लाळ गोड आहे. तसे "या विषयामाजी सुख ! आहे म्हणणे सत्य नोहे' हा उपदेश आचार्यांनी मातेला केला आचार्य मातेचा निरोप घेवून नर्मदा तीरावर निवास करणाऱ्या क्षोत्रिय व ब्रह्मनिष्ठ अशा गोविंद भगवत्‌ पूज्यपादाचार्य यांच्याकडे गेले, त्यांना आचार्यांनी साष्टांग दंडवत केले, मला उपदेश करून माझा उद्धार करा अशी विनंती त्यांना केली. श्रीगुरुंनी आचार्यांची नम्रता, तळमळ व सद्‌भावना पाहून हे अधिकारी आहेत असे जाणून त्यांना मंत्रदिक्षा दिली. बाल शंकराचार्यांना सनातन वैदिक धर्मान्तर्गत अद्वैत सिद्धांताचा प्रचार करण्याची गुरुंनी आज्ञा दिली. भगवतगीता, ब्रह्मसूत्रे व उपनिषदे यांचे भाष्य (टिका) करण्यास सांगितले. गुरुंच्या आज्ञेप्रमाणे शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रे, उपनिषदे व गीता यावर सुंदर भाष्य केले आहे. या आधात्म गं्रथांवर अनेकांनी टीका लिहिल्या आहेत परंतु अत्यंत सुगम संस्कृत भाषेत शंकराचार्यांनी जशी टीका लिहिली आहे तशी कोणीही लिहिली नाही, आचार्यांचा स्थायी भाव ज्ञान नसून भक्ती हा होता. आद्य गुरु शंकराचार्य म्हणजे आश्र्चर्यकारक उत्साह व प्रचंड कार्य याचा मुर्तिमन्त अवतार होते. भारतीय तत्त्वज्ञानात अनासक्ती आणि त्याग यावर भाष्य करणारे व ते तळागाळात रुजवणारे अशी त्यांची ओळख आहे. जीवनातील कुरुक्षेत्रातून पळून जाऊन एखाद्या बिळात बसून अथवा तपोवनात बसून मला मोक्ष मिळू दे असे म्हणणाऱ्यातले ते नव्हते. हिंदुस्थानातील दक्षिणेमधील अगदी एका टोकाला जन्म झालेला असतांना असंख्य लोकांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करीत आणि नवचैतन्याचा प्रसार करीत. सबंध हिन्दुस्थानात असंख्य वाऱ्या करून हा विशाल देश त्यांनी अक्षरश: पालथा घातला. निश्र्चित असे आपले काही कार्य आहे याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत सारा देश त्यांनी आपले कर्मक्षेत्र मानले. हा देश वरवर निराळा दिसला तरी त्याच्या असंख्य कला त्यांनी अनुभवल्या. हा देश जसा अनेक जाती धर्मात, रिती रिवाजात, रुढी परंपरामध्ये निराळा असला तरी त्याच्यात त्यांना एकच आत्मा धगधगत आहे असे वाटत असावे. तत्कालीन भारतात नाना मतमतांतरे असून एकात्मतेचा ऱ्हास झाला होता. शंकराचार्यांनी या सर्वांचा परामर्ष घेऊन एक सर्वव्यापी मत स्थापण्याची पराकाष्ठा केली. केवळ बत्तीस वर्षाच्या आयुष्यात अनेक दीर्घ जन्मांचे कार्य त्यांनी केले. ते तत्त्वज्ञानी होते, गाढे पंडीत होते, कवी होते, संत होते आणि हे सारे काही असून ते कुशल संघटक व समाज सुधारक होते. भारतातील चारही दिशांना त्यांनी दूरदृष्टीने चार मठ स्थापले. एक म्हैसूर संस्थानात शृंगेरी येथे आहे, दुसरा पुर्व किनाऱ्यावर जगन्नाथ पुरी येथे, तिसरा पश्र्चिम किनाऱ्यावर काठेवाड मधील द्वारकेत आहे आणि चौथा हिमालयातील अंतरंगात म्हणजे बद्रिनाथ येथे आहे. आद्य गुरु शंकराचार्यांनी वयाच्या बत्तिसाव्या वर्षी हिमालयाच्या हिमाच्छादित उत्तुंग केदारनाथ या ठिकाणी देह ठेवला. हिंदुस्थानाच्या चार कोपऱ्यात चार मठ स्थापून हिंदुस्थानच्या सांस्कृतिक ऐक्याची कल्पना त्यांना आणखी दृढ करायची होती असे दिसते. ज्या काळात प्रवास करणे अति कठीण होते, दळणवळणाची साधने मर्यादित तथा मंदगतीची होती अशा काळात शंकराचार्यांनी केलेल्या प्रवासास विशेष महत्व आहे. बहुजनसमाजासाठीही त्यांनी अनेक प्रकारे कार्य केले आहे. अंधश्रद्धेने, कडवेपणाने पाळलेले अनेक धर्मप्रकार त्यांनी मोडून काढले आणि ज्याची पात्रता असेल त्या सर्वांनाच आपल्या तत्वज्ञानाच्या पवित्र मंदिराची दारे त्यांनी खुली ठेवली.

टिप्पणियाँ

Populars