शिव उपासना - सोळा साेमवार विधी



।। सोळा सोमवाराचे व्रत ।।

'"सोळा सोमवार" म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला अर्ध्या दिवसाचा उपास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दु:ख-दारिद्ऱ्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीहि सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी, किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात. व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे, अशी अपेक्षा असते. व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवतात.

 १६ सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या १७व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात. १७व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते. व्रत करणारा दिवसभर उपास करतो. ज्याल उपास जमत नाहीत त्याने शिरा, खीर वगैरे "गहू, गूळ व तूप" मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते. व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचमोपचार पूजा करतो व "सोळा सोमवार कथा."(कहाणी) किंवा "सोळा सोमवार माहात्म्य " ही पोथी वाचतो. नंतर "शिवस्तुती" म्हणून आरती करतो. त्यानंतर कणकेच्या चूरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या सोळा सोमवारी करतात. 

कणकेचा चूरमा तुपात खरपूस तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाजलेल्या भाकऱ्यांचा किंवा मुटक्यांचा कुसकरा करून तो चाळतात. त्यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घातल्यावर चूरमा बनतो. त्याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नसते. व्रत करणाऱ्याने अर्धाशेर कणिकेचा चूरमा खाणे अपेक्षित असते. उपास सोडताना मीठ खाणे वर्ज्य असते. व्रताचे उद्यापन *'उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी कणकेचा चूरमा लागतो. पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या आणि अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ, १०८ किंवा १००८ बेलाची पाने व नैवेद्य या सोळा वस्तू असतात. देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात. मनांतल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात व चूरम्याचे तीन भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा व तिसरा भाग घरी आणावा. 

*शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास, किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षोडशोपचार पूजा करता येते. *उद्यापनाच्या दिवशी देवळांत पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील १६ सोमवारांप्रमाणे "सोळा सोमवार कथा" व "सोळा सोमवार माहात्म्य" वाचतात, हवनात्मक *लघुरुद्र स्वाहाकार* करावा, "शिवस्तुती" म्हणून आरती करतात; चूरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खातात. कुटुंबातले सर्वजण पंचपक्वान्नाचे भोजन करतात. हे व्रत मनोभावे करणाऱ्याची इच्छा श्रीशंकर पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.

टिप्पणियाँ

Populars